जमिनीच्या वादातून अरणगाव शिवारात तरुणावर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: जमिनीच्या जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, अहिल्यानगर-खडकी रस्त्यावरील अरणगाव बायपास पुलाखाली एका तरुणावर विटांनी आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याण जिमदार काळे हे आपल्या दुचाकीवरून अहिल्यानगरहून खडकीच्या दिशेने जात होते. अरणगाव शिवारात पोहचले असता, आरोपी दीपक मुकेश भोसले याने पाठीमागून येत त्यांची दुचाकी अडवली. जुन्या जमिनीच्या कागदपत्रांच्या कारणावरून वाद उकरून काढत त्याने फिर्यादीला लाथ मारून खाली पाडले. “जमिनीचे कागदपत्र मला दे,” अशी मागणी करत दीपकने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच जवळच पडलेल्या विटकरीने त्यांच्या हातावर, पाठीवर आणि बरगडीत गंभीर दुखापत केली.
याच वेळी आरोपी नवनाथ मुकेश भोसले आणि शैलेश मुकेश भोसले त्या ठिकाणी आले. त्यांनीही फिर्यादीला बेदम मारहाण केली. आरोपी शैलेशने फिर्यादीच्या दुचाकीवर दगड टाकून वाहनाचे नुकसान केले आणि चावी फेकून दिली. “जर पोलिसांत तक्रार दिली तर तुला आणि तुझ्या लेकराबाळांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत फिर्यादीच्या बॅगेतील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. पोलिसांनी दीपक, नवनाथ आणि शैलेश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार काळे करत आहेत.


