सासरवाडीत जावायाला बेदम मारहाण; यात्रेच्या वादातून दोन गटात हाणामारी ,नेप्ती रोड परिसरातील घटना

घरगुती वादातून मेहुण्याकडून पतीला बेदम मारहाण; केडगाव परिसरातील घटना
​अहिल्यानगर: केडगाव येथील नेप्ती रोड परिसरातील पठारे मळा येथे घरगुती वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, पत्नीने बोलावलेल्या माहेरच्या मंडळींनी पतीला लाकडी दांडके आणि पाईपने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिद्र पठारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये सकाळी घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून पत्नीने आपल्या माहेरच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी मेहुणा देविदास जगताप हा आपल्या इतर पाच साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या कारमधून पठारे यांच्या घरी पोहचला.
​फिर्यादी अहिल्यानगर येथून घरी परतल्यानंतर आरोपींनी त्यांना गाठले. “तुमचा माज जास्त वाढला आहे” असे म्हणत मेहुण्याने अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, उपस्थित महिला नातेवाईकाने त्यांचे हात धरून ठेवले. याच दरम्यान आरोपी देविदासने प्लास्टिक पाईपने तर इतर साथीदारांनी पट्ट्याने आणि लाकडी दांडक्याने फिर्यादीला बेदम मारहाण केली.

​या झटापटीत फिर्यादीच्या हातातील सुमारे दीड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या कोठेतरी गहाळ झाल्या आहेत. आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी देविदास जगताप, चिंगु जगताप, मनीषा जगताप आणि इतर तिघांविरुद्ध मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

—————————————————————————————————————————————————————
यात्रेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात यात्रेच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​पहिली घटना नेप्ती गावातील बिरोबा मंदिराजवळ घडली. फिर्यादी सार्थक रभाजी जपकर यांचा भाऊ शुभम याला आरोपी मारहाण करत होते. सार्थक हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपी संकेत अर्जुन मोरे याने त्याच्या पाठीवर दगड मारला. त्यानंतर मिलिंद अर्जुन मोरे, सिद्धांत अशोक जपकर आणि सुभाष मोरे यांनी लाकडी काठीने सार्थकला डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. आरोपींनी यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
​मारहाणीची दुसरी घटना २७ एप्रिल रोजी घडली. जखमी फिर्यादीला रुग्णालयात नेल्याचा राग मनात धरून आरोपी संकेत मोरे आणि मिलिंद मोरे यांनी अभिजीत गोरे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबातील महिलांच्या अंगावर धावून जात त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरोदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles