विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूकहोणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत एका पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वाट्याला सहा, शिंदेसेनेला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारआणि मविआच्या वाट्याला एक जागा आली आहे. महायुती आणि मविआने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महायुतीमधील भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी सुनिल कर्जतकर, डॉ. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच शिंदे सेनेकडून माजी मंत्री बच्चू कडू आणि विधानपरिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्या ठाकरे सेनेकडून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली आहे.दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्या ठाकरे सेनेने कुठलीही चर्चा न करता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, आज सकाळी ठाकरे सेनेचे नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि सचिन आहिर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची विधानभवनातील कार्यलयात भेट घेतली. यावेळी त्यांनी उमेदवार न देण्याची विनंती केली. त्यानंतर आता काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानपरिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्या विधानसभेत महायुतीमधील भाजपकडे १३१ आमदार आहेत. तर शिंदे सेनेकडे ५७, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० तर महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे १० आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचे आठ आणि मविआचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.


