विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आज सकाळी 11 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठविण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचं दिसून येत आहे
एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. कालच सहा उमेदवार जाहीर करणार भाजप, अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे. सत्तेत असलेली राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे, त्यातच नाराजीवरून महाविकास आघाडीतली काही मतं फोडण्यात भाजपला यश आलं. तर नक्कीच भाजपचा सातवा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. शिवसेनेच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झालीय. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध न होण्याची शक्यता बळावली आहे.


