इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह ;इंदुरीकरांचे टीकाकारांना आव्हान ‘लग्न जोरात करणार, काय बोंबलायचं बोंबला’

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा गेल्यावर्षी शाही पद्धतीने झालेला साखरपुडा चांगलाच गाजला. मुलीचा विवाह सोहळा अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात उद्या तीन मे रोजी होत असताना, त्याची देखील जंगी तयारी करण्यात आली आहे.

शाही सारखपुड्यावरून झालेल्या टीकेनंतर, इंदुरीकर महाराज यांनी टीकाकारांना, ‘लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचंय बोंबला’, असं म्हणत डिवचलं होतं. त्याचपद्धतीनं इंदुरीकर महाराज यांनी मुलीच्या विवाहाची शाही तयारी केल्याचे दिसते. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा भव्य-दिव्य विवाह सोहळा उद्या तीन मे रोजी पार पडणार आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात, 100 एकर परिसरात हा विवाह सोहळा होणार आहे.

या विवाह सोहळ्याला लाखो लोक सोहळ्याला हजेरी लावतील, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार तसेच राज्यभरातील अनेक दिग्गजांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय दिग्गजांना आणि संत महंतांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याने सोहळ्याला राजकीय रंगही चढला आहे.

“लग्न साधं करा” असा संदेश देणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने स्वतःच आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे, उद्या दुपारी तीन मे रोजी याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळाही पार पडणार आहे.दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी गेल्यावर्षी कन्येचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता. साखरपुड्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरून त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती. दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात, असं म्हणत त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

या वेळी इंदुरीकर महाराजांनी, ‘लग्न जोरात करणार, काय बोंबलायचं बोंबला’, असं म्हटलं टीकाकारांना आव्हान दिलं होतं. तसेच एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारून दाखवावं, असंही इंदुरीकर महाराजांनी विधान केलं होतं. आता उद्या इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा शाही थाटात विवाह होत आहे. विवाह सोहळ्यातील झगमग कशी असणार, याची आता उत्सुकता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles