मुलीच्या लग्नासाठी १० एकराचा मांडव, ३ लाख पाहुणे; शाही थाटावरून इंदोरीकर महाराजांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली आहे. साखरपुड्यापासूनच चर्चेत असलेल्या या विवाहासाठी अनेक राजकीय दिग्गजांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले. मुलीच्या साखरपुड्याला नेटकऱ्यांनी इंदोरीकर महाराज यांना चांगलेच ट्रोल केले होते. दरम्यान या वेळेस इंदोरीकर महाराज यांनी आपल्या शैलीमध्ये ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलं आहे.प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अत्यंत शाही थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी गुंजाळवाडी येथे तब्बल 10 एकर क्षेत्रात भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. सुमारे 3 लाख लोकांसाठी भोजन आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या शाही सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, विवेक कोल्हे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

“लोकांना साधेपणाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न इतके मोठे का करतात?” असा प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलर्सना इंदोरीकर महाराजांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले की, “लोक विचारतील एवढा खर्च कुठून आला, पण माझ्या भक्तमंडळाने जवळपास ९० टक्के खर्च उचलला आहे. देणगीदारांनी स्वेच्छेने मदत केली आहे, त्यामुळे कोणालाही ट्रोल करण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, “ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या क्षमतेनुसार विवाह सोहळा करावा,” असेही त्यांनी सांगितले. या भव्य विवाह सोहळ्यामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पुढील काही काळ या विवाहाची चर्चा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles