पाथर्डी -शहरातील नाथनगर परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्या व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या प्रकरणी गौरव विश्वास (वय 45) याच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हाभर बोगस वैद्यकीय व्यवसायिकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, परमेश्वर बडे, सचिन निकम, व दोन पंच यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी नाथनगर येथील मुळव्याध भगंदर उपचार केंद्र प्राकृतीक चिकित्सालय डॉ. गौरव कुमार या नावाने सुरू असलेल्या केंद्रावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना तसेच वैद्यकीय पदवीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्याच्याकडे कोणतीही अधिकृत पदवी अथवा परवाना नसल्याचे उघड झाले. पथकाने तेथून उपचारासाठी वापरले जाणारे औषधे, वैद्यकीय साहित्य व सुमारे दोन हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दरंदले यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गौरव गोवचंद्र विश्वास, हल्ली रा. मोहरी ता. पाथर्डी, मूळ रा. बहीरगांसिंग, ता. प्रतापगड, राज्य पश्चिम बंगाल याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


