अहिल्यानगर – तालुक्यातील दहिगाव येथे भर दुपारी मारुती नेटके यांच्या घराला आग लागली. नेटके हे आपल्या कुटुंबासह शेतात शेत काम करत असताना घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धुर व आवाज येऊ लागल्याने गावातील तरुणांनी धूराच्या दिशेने धाव घेतली. सदर आग लागल्याची खबर नेटके कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली परंतु तो पर्यंत आग संपूर्ण घरात पसरली होती. चोहोबाजूंनी आगीने वेढा टाकला होता. घरात गॅस सिलिंडर टाकी असल्याने आग विझवणे मोठ्या धाडसाच काम होत. या वेळी गावातील राधाकिसन कासार, रविराज पोटरे, समाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, संजय शिंदे, अभिमन्यु नेटके, शाम जाधव यांनी मिळून जाळ चालू असताना गॅस टाकी बाहेर काढण्याचे काम केले. आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले.
नगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी काही मिनिटांत दहिगावात पोहचली परंतू अतिक्रमणामुळं अग्निशमन दलाची गाडी मोठी कसरत करत नेटके यांच्या घरापर्यंत पोहचली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शेजारील घर आगीपासून वाचले. या आगीत सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. वस्तू धान्य, शाळेतील मुलांचे दप्तर जळून मोठ आर्थिक नुकसान झाले आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वाहन चालक शुभम गावडे,फायरमन मच्छिंद्र धोत्रे ,अक्षय घुले,विठ्ठल चितळकर तसेच गावातील शाम जाधव, संजय शिंदे, राधाकिसन कासर, शिवा म्हस्के, रवीराज पोटरे,बंडु शिंदे, अंकुश जाधव, सुधीर म्हस्के, दत्तात्रय म्हस्के, मधुकर म्हस्के, आदी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले
नगर तालुक्यातील दहिगावमध्ये भरदुपारी घराला आग ; संसारोपयोगी वस्तू जळून खाक
- Advertisement -


