देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत, पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आलं आहे. भारतीय जनता पार्टीने विक्रमी २०७ जागांवर विजय संपादन करत एकहाती सत्ता मिळवली आहे. अनेक मुद्द्यांवरुन वादात सापडलेली ही निवडणूक निकालानंतर देखील वादग्रस्त ठरत आहे. बंगालच्या निकालाचे देशासह विदेशातही पडसाद पाहायला मिळाले. या विजयाबद्दल थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच मोदींचे कौतुक केले. पण, याबाबत शिवसेना नेते संजय राऊतांनी ट्रम्प यांनी पत्र लिहून या निवडणुकीत घडलेल्या घटना, आरोपांचा तपशील दिला आहे.
बंगालच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केलेल्या अभिनंदनाबाबत समोर आलेल्या वृत्ताला अनुसरुन संजय राऊतांनी हे पत्र लिहले असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. राऊतांनी या पत्रात निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत कशाप्रकारे संशय व्यक्त केला जात आहे. आयोगाने भाजपाच्या फायद्याची भूमिका कशी घेतली याबाबत जनमानसात संभ्रमाची अवस्था आहे. बंगालमध्ये केंद्रीय दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आल्याचा उल्लेख देखील राऊतांनी पत्रात केला आहे. लोकशाहीत निवडणुका मुक्त, न्याय्य आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे, असे राऊतांनी पत्रात नमूद केले आहे.
“भारतात आता झालेल्या निवडणुका राज्य स्तरावरील असून, हा भारताच्या फेडरल लोकशाहीचा अंतर्गत विषय आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बाह्य समर्थनाचे विधान अकाली आणि अवाजवी वाटते. महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणूक प्रक्रियेबाबत काही गंभीर विषय समोर आले आहेत. भीतीचे वातावरण, धमक्या देणे आणि दबावतंत्र वापरल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निःपक्ष काम केलेले नाही, आयोगाची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या फायद्याची होती, अशी धारणा जनमानसात आहे, ज्यामुळे घटनात्मक संस्थांच्या तटस्थतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे”, असे राऊतांनी पत्रात लिहले आहे.


