कर्जत: नगरपंचायतच्या नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना लेखी पत्र देऊन अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. यामुळे कर्जतमध्ये ( अहिल्यानगर) पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे १३ नगरसेवकांनी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर गटनेते प्रा. सतीश पाटील, सुवर्णा रवींद्र सुपेकर, उषा अक्षय राऊत, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, लंकाबाई देविदास खरात, छाया सुनील शेलार, अश्विनी गजानन दळवी, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, नामदेव चंद्रकांत राऊत, अमृत श्रीधर काळदाते, ज्योती लालासाहेब शेळके यांच्या सह्या आहेत. नगरपंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक आहेत.
त्यापैकी १३ जणांनी नगराध्यक्षांना हटवण्याची मागणी केली आहे. नगराध्यक्षांना हटवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व त्यांचे परंपरागत विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) रोहित पवार यांचे समर्थक नगरसेवक एकत्र आले आहेत.
अविश्वास प्रस्तावामध्ये म्हटले की, नगराध्यक्ष रोहिणी घुले नगरपंचायतचे कामकाज पाहताना कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे, शासनाच्या नियमांचे पालन न करता त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार मनमानी पद्धतीने कारभार करतात. नगराध्यक्ष या आमच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी केल्यानंतर आम्हास नगरपंचायतीचे कामकाज करताना विश्वासात न घेता, मनमानी
पद्धतीने कामकाज करतात.नागरिकांच्या सोयीसुविधा तातडीने मिळतील अशी व्यवस्था करण्याची मागणी केल्यास त्या मागणीकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ करतात. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटत नाही. यासह इतरही मुद्दे मांडून अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.
अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे कर्जत तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भूमिका यामध्ये निर्णायक राहणार आहे.
कर्जत नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव, पदावरून हटविण्यासाठी राम शिंदे व रोहित पवार एकत्र
- Advertisement -


