भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली अनेकांचे सर्वस्व हिरावले आहे. या भोंदूवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची SIT चौकशीची मागणी करण्यात येत होती. रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीला सामोरं जाणार असल्याचं समजते. एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकर या नाशिककडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत वकील सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनाही आरोपी करण्याची मागणी करण्यात येत होती.
आज नाशिकमध्ये एसआयटीसमोर त्या हजर होतील. एसआयटीकडून भोंदू अशोक खरात प्रकरणात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकर या सकाळीच पुण्याहून नाशिकसाठी रवाना झाल्याचे समजते. तर त्या थोड्या वेळानंतर एसआयटीसमोर हजर होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सुद्धा संचालक म्हणून होत्या. त्यामुळे या चौकशीत आता अजून काय काय समोरं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात, भोंदू अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला कडेकोट बंदोबस्तात काल राहाता न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिर्डी पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. शिर्डीसह आसपासच्या शिवारात भोंदू खरातने आर्थिक फसवणूक करून अनेक शेतकऱ्यांच्या जमीन लाटल्याचे समोर आले आहे.


