दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषत विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा उच्चांकी तापणार आहे. पुढील 3 दिवसात राज्यातील उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी होत चालल्याने उत्तरेकडील राज्यांतून गरम वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत तापमानात तब्बल ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये पारा पुन्हा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, १२ ते १४ मे २०२६ दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.


