मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्या सरकारविरोधात एल्गार पुकारला असून थेट आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. जरांगे येत्या 30 मेपासून उपोषणाल सुरुवात करणार आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा गॅझेट लागू करावे या सर्व मागण्याही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषणच हत्यार पुन्हा उपसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरक्षणविषयी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याने जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.
आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी द्यायला तयार होतो, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, आता महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासंदर्भात आम्ही विनंती केली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरांगे पाटलांचे समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे मोठे विधान विखे पाटील यांनी केले. तसेच मी लवकरच मनोज जरांगे पाटलांना भेटेल आणि आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देईल. त्यांचे काही गैरसमज असतील ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.


