अहिल्यानगर – शहरातील कल्याण रोड परिसरात रील स्टार तसेच ‘रुबाब मेन्स वेअर’चे मालक सनी जाधव यांच्यावर दोन जणांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचवेळी परिसरात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आरोपींना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी पोलिसांनी रवी साळुंखे आणि निखिल चव्हाण (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. घटनेनंतर कल्याण रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोबाईलच्या स्क्रीनवर स्टाईल आणि रुबाब दाखवून तरुणाईला आकर्षित करणाऱ्या एका प्रसिद्ध रीलस्टारचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सोशल मीडियावरील चमकधमक आणि प्रत्यक्षातील गुन्हेगारी चेहरा उघडा पाडणाऱ्या या घटनेत, रीलस्टार सनी जाधव आणि त्याच्या ४ साथीदारांनी मिळून एका तरुणाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार अहिल्यानगर शहरात घडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी सनी जाधव आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचला होता.त्यांनी पीडित तरुणाला विश्वासात घेऊन,ओळखीच्या माध्यमातून एका ठिकाणी तातडीने भेटीसाठी बोलावले.तरुण तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या या टोळीने त्याला घेरले.काही समजण्याच्या आतच आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी व लाकडी दांडक्याने थेट त्याच्या डोक्यावर गंभीर प्रहार केले.


