आता 18 व्या दिवशीही दमदार कमाई करत ‘राजा शिवाजी’ हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा मराठी चित्रपट बनून इतिहास रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’लाही मागे टाकलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. हा चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले आणि डोळे पाणावले, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा भारतातील 18 दिवसांतील नेट कलेक्शनचा आकडा आता 94.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दहा वर्षांपूर्वी 2016 मध्ये ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
‘प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले रितेश देशमुख, धीरज देशमुख, सून जिनिलिया देशमुख आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जयंत पाटील यांच्या या पोस्टवर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदरणीय जयंत पाटील साहेब, आपला फोन आला आणि आपल्याला शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित आमचा चित्रपट ‘राजा शिवाजी’ आवडल्याचं समजल्याने आम्हाला खूप आनंद झाला. आपण संपूर्ण टीमचं कौतुक केलं, प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली, याने आम्हाला खूप ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळालं आहे. आमच्या या प्रयत्नांना आपले मार्गदर्शन आणि प्रेम मिळत राहू हीच अपेक्षा. मी आणि आमची संपूर्ण टीम आपली मन:पूर्वक आभारी आहे,’ अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.


