राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडका लावला असून शिपायापासून ते तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक केलीय. त्यामुळे, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एसीबी कारवाईचा धाक प्रशासनातील अधिकाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अद्यापही लाचखोर कर्मचारी, अधिकारी एसीबीच्या गळ्याला लागत आहेत. आता, पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेल्हार ग्रामपंचायतच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. सोमवार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या उज्वला प्रवीण पाटील यांची चौकशी केली जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने केलेल्या रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी उज्वला पाटील यांनी ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच मौजे बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक १३/०३ या जमिनीवर करण्यात आलेल्या माती भरणीच्या पंचनाम्यासंदर्भात १ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणजे ४५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने उज्वला प्रवीण पाटील यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसई-विरार शहर परिसरातील ग्रामपंचायती तसेच तलाठी कार्यालयांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून एसीबीच्या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


