राज्यातील महायुती सरकारकडून लवकरच बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढच्या काही दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या महामंडळांचे वाटप पूर्ण होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे नेते आणि पदाधिकारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षांची ताकद, आमदारांची संख्या आणि राजकीय समीकरणे विचारात घेऊन महामंडळ वाटपाचे समीकरण ठरले आहे. भारतीय जनता पक्षाची राज्यातली ताकद लक्षात घेता अर्थातच मोठा पक्ष म्हणून जास्त महामंडळे त्यांच्या वाट्याला येणार आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला महामंडळात वाटा मिळणार आहे.
महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजपा 48 टक्के, शिवसेना 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 20 टक्के महामंडळ, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. येत्या महिनाभरात यावर शिक्कामोर्तब होईल.राज्यात आता पुढील दोन अडीच वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत. परंतू अशावेळीही महामंडळांचे जागा वाटप कोणत्याही परिस्थितीत रेंगाळत न ठेवता ते लवकरात लवकर पूर्ण करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर आहे. महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यानंतर तिन्ही पक्षांचे नेते कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची हा निर्णय घेतील.


