दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक ६ वर्षांची मुलगी डोळ्यांच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र शस्त्रक्रिया चालू असताना ती अत्यवस्थ झाली आणि नंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं मंगेशकर रुग्णालयातील कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
नगरचे खासदार निलेश लंके यांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी किंवा हॉस्पिटल प्रशासनावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
खासदार लंके यांनी म्हटले आहे की,
माझ्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सुपा, पारनेर येथील रहिवाशी असलेली प्रियांशी बागडे ही अवघी ६ वर्षांची चिमुरडी डोळ्यात तिरळेपणाचा त्रास असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनाने सर्व वैद्यकीय तपासण्या आणि रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल असल्याचे सांगत पालकांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली होती. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पालकांनी पूर्ण विश्वास ठेवून आपल्या निष्पाप मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
ठरल्याप्रमाणे काल शस्त्रक्रियेसाठी प्रियांशीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र ऑपरेशन सुरू होण्यापूर्वीच तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकल्यानंतर अचानक तिची प्रकृती गंभीररीत्या बिघडली आणि तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, पालकांना कोणतीही माहिती न देता तिला तातडीने आयसीयू मध्ये हलवण्यात आले. परिस्थिती इतकी गंभीर असतानाही कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आले.
पालकांना नंतर फक्त “मुलीची तब्येत अचानक बिघडली असून आम्ही CPR देत आहोत” एवढीच माहिती देण्यात आली. मात्र काही वेळातच त्या निष्पाप ६ वर्षांच्या चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला. उपचारासाठी विश्वासाने आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या संपूर्ण प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत :-
• सर्व रिपोर्ट नॉर्मल असताना अचानक अशी गंभीर प्रतिक्रिया कशी झाली?
• ऑपरेशनपूर्वी आवश्यक काळजी आणि वैद्यकीय प्रोटोकॉल पाळले गेले होते का?
• मुलीची प्रकृती बिघडत असताना पालकांना तातडीने माहिती का देण्यात आली नाही?
• पालकांना न सांगता मुलीला आयसीयू मध्ये हलवण्याची वेळ का आली?
• उपचार प्रक्रियेत कोणतीही निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा झाला का?
एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेला आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन सरकारने आणि आरोग्य विभागाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी किंवा हॉस्पिटल प्रशासनावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालय व्यवस्थेची जबाबदारी निश्चित होणे अत्यावश्यक आहे.
चिमुरड्या प्रियांशीला भावपूर्ण श्रद्धांजली.
न्याय मिळालाच पाहिजे!


