सोशल मीडियावरील अफवांवर कारवाई, नमाजवेळी चोख बंदोबस्त आणि स्वच्छता व्यवस्थेची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गुरुवारी (दि.28 मे) रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईद (ईद-उल-अजहा) सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत गाईला असलेले महत्त्व लक्षात घेऊन तिला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याबाबत केंद्र सरकारकडे सकारात्मक शिफारस पाठवावी, अशी मागणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य आणि आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना निवेदन दिले. यावेळी आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक समद खान, मौलाना शफीक कासमी, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, अकबर अली शेख, नईम सरदार, संजू जहागीरदार, मोहसिन शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बकरी ईद सण शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावा, यासाठी मुस्लिम समाज प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल. मात्र सणाच्या काळात काही समाजकंटक सोशल मीडियावर खोट्या किंवा जुन्या पोस्ट व्हायरल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिसांनी आधीपासूनच लक्ष ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच कायदेशीर पद्धतीने मटणाची वाहतूक किंवा वाटप करणाऱ्या नागरिकांना केवळ संशयाच्या आधारावर अडवून कायदा हातात घेणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्य नमाजच्या वेळी शहरातील ईदगाह आणि प्रमुख मशिदी परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आवाहनही प्रशासनाला करण्यात आले आहे.
आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबतही निवेदनात विशेष मुद्दे मांडण्यात आले. कुर्बानीनंतर निर्माण होणारा कचरा आणि अवशेष तात्काळ उचलण्यासाठी महानगरपालिकेने विशेष पथके व घंटागाड्या तैनात कराव्यात, तसेच दुर्गंधी टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी युद्धपातळीवर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सणाच्या काळात संबंधित भागात अखंडित पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठीही प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद आहे.
मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला हेही आश्वासन देण्यात आले की, मशिदींमधून नागरिकांना नियमांचे पालन, स्वच्छता राखणे आणि शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात येईल. प्रशासनाने अधिकृत अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि कचरा व्यवस्थापनाबाबत पूर्वनियोजन केल्यास समाजाकडूनही पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
निवेदनातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची मागणी हा ठरला. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत ‘गोमाता’ हे कोट्यवधी हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असून मुस्लिम समाज त्या भावनांचा पूर्ण आदर करतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजात कायमस्वरूपी शांतता, बंधुभाव आणि परस्पर विश्वास वृद्धिंगत व्हावा, तसेच गोवंश रक्षणाला चालना मिळावी यासाठी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही बाब अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रहिताची असल्याने अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे यासंदर्भात सकारात्मक शिफारस पाठवावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे.
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची शिफारस करा,नगरमधील मुस्लिम समाजाची मागणी
- Advertisement -


