माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजून आमच्याकडे माहिती नसल्याचे म्हटलं आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, ते पक्षाचे माजी मंत्री राहिले आहेत.मंगळवारी रात्री त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असून बुधवारी किंवा गुरूवारी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे. दरम्यान, महायुतीमधील कुरबुरीवर ते म्हणाले की, फार काळ एकवाक्यता राहील असं वाटत नाही. दोन पक्षात चढाओढ लागली आहे. दिल्लीत काय निर्णय होतोय याची आम्ही देखील वाट बघत आहोत. एकमताने प्रत्येक नेत्यात एकवाक्यता नाही. दरम्यान, अजित पवार गटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर शशिकांत शिंदे म्हणाले की, जो अजितदादा यांनी धोका ओळखला तोच धोका आता छगन भुजबळ यांनी ओळखला आहे. आज त्यांच्या पार्टीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरे नेते त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप इतर राज्यांचा अनुभव घेऊन मित्र पक्षांना संपवण्याचा प्रयत्न आहे. शब्द दिला आणि त्यांनी पाळला नसेल तर ते गंभीर आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भाजप त्यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पक्षातील लोकांना देखील हे माहित आहे. मित्र पक्षाला किती जागा देत आहेत याची माहिती त्यांना मिळाली असेल.


