अहिल्यानगर,-पुणे येथील कुख्यात आदेकर टोळीतील ‘कोयता गँग’चे सदस्य दरोड्याच्या तयारीत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात जेरबंद झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपींकडून 4 गावठी कट्टे, 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकू असा एकूण 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिलिट्री इंटेलिजेन्स, साउथ कमांड, अहिल्यानगर यांच्याकडून इनपुट मिळाले. मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ, बुऱ्हानगर रोड, भिंगार येथे काही इसम अग्निशस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सुनील पवार, विष्णू भागवत, शाहिद शेख, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड यांचे पथक तात्काळ रवाना झाले. पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता 5 इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच एक इसम मोटारसायकलवरून पळून गेला. पथकाने उर्वरित 4 जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले.
आरोपींची नावे
ताब्यातील आरोपींनी आपली नावे 1) मुस्ताक ईब्राहिम शेख वय 22, रा. कोंढवा, आश्रमनगर, पुणे, 2) विराट उर्फ विल्यम रविंद्र मेहंदळे वय 26, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, 3) समर्थ बाबासाहेब माडळकर वय 19, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, 4) समर्थ राजेंद्र दुधभाते वय 18, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे अशी सांगितली. पळून गेलेल्या इसमाचे नाव आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे, भिंगार असे असल्याचे सांगितले.
1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
आरोपींच्या अंगझडतीत 1 गावठी कट्टा, 1 जिवंत काडतुस, कोयता, चाकू, मोबाईल असा 1 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. 288/2025 भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5), सह आर्म ॲक्ट कलम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
पळून गेलेला आरोपीही जेरबंद
गुन्ह्याच्या तपासात वरील 4 आरोपींना अटक करून न्यायालयाने त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. तपासादरम्यान पळून गेलेला आकाश संजय पवार यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 3 गावठी कट्टे आणि 9 हजार रुपये किमतीची 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
एकूण 2.76 लाखांचा शस्त्रसाठा
या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे 4 गावठी कट्टे, 10 हजार रुपये किमतीची 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, मोबाईल असा एकूण 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
आरोपींवर गंभीर गुन्हे
सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व पुणे शहरामध्ये खून, शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


