गुन्ह्यात मदतीसाठी 2 लाख मागितले, 1 लाखावर तडजोड:नगर तालुक्यातील PSI गांगुर्डेविरुद्ध ACB चा गुन्हा

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक येथून गांगुर्डे याला ताब्यात घेतले असल्याचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले. ACB चे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

दोन लाखांची मागणी, एक लाखावर तडजोड
उपनिरीक्षक गांगुर्डे हा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याने एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीनंतर एक लाख रुपयांवर व्यवहार निश्चित करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तक्रारदाराने 18 मे 2026 रोजी ACB कडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराच्या मामासह 15 जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गांगुर्डे याच्याकडे होता. संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपींना सहकार्य करण्याच्या मोबदल्यात गांगुर्डे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पडताळणी
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट ACB कडे धाव घेतली. यानंतर पंचांसमक्ष पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पडताळणी कारवाई केली असता संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी गांगुर्डे याने तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंद करून गांगुर्डे याला ताब्यात घेतले.

पदोन्नतीच्या आठवड्यातच कारवाई
गेल्या आठ दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक गांगुर्डे याची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती. त्याची बदली नाशिक येथे झाली आहे. मात्र पदोन्नतीनंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठवण्यात आले होते. तेथेच त्याने तक्रारदाराकडे लाच मागितली.

दरम्यान, त्याला मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आणि बुधवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles