बीड जिल्ह्यात एका ढाब्यावर झालेल्या कथित वादाच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या प्रयत्नात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तक्रारदार समाधान खिंडकर यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार समाधान खिंडकर हे आपल्या काही मित्रांसह बीडमधील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे धनंजय देशमुख आणि सोशल मीडियावरील रील स्टार रविराज साबळे हे देखील उपस्थित होते. जेवण सुरू असताना समाधान खिंडकर हे रविराज साबळे यांना त्यांच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ दाखवत होते. याच दरम्यान धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने अचानक पुढे येत खिंडकर यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल का हिसकावला? याबाबत खिंडकर यांनी जाब विचारला असता, तिथे दोन्ही बाजूंनी वाद वाढला. तक्रारदार समाधान खिंडकर यांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, हा वाद सुरू असताना धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाकडील बंदूक स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी ती बंदूक थेट खिंडकर यांच्या कानाला लावली आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे ढाब्यावर एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमागे नक्की काय कारण होते आणि पोलिस यावर काय पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बीड ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
- Advertisement -


