अहिल्यानगर, 2 जून 2026: समृद्धी महामार्गावर वाहने अडवून मारहाण करून लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसांत जेरबंद केली आहे. या कारवाईत 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
27 मे रोजी घडले होते 3 दरोडे
दि. 27 मे रोजी दुपारी 3 वाजता लातूर येथील ट्रकचालक दत्ता राजुळे यांना पोल क्रमांक 529.9 जवळ 7 ते 8 आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून डिझेल व रोख रक्कम असा 7465 रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्याच टोळीने वॅगनर कारचालक दांपत्याला दमदाटी करून 1,24,000 रुपयांचे दागिने व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर ट्रक क्रमांक बीआर 03 जीबी 4883 वरील चालकाला मारहाण करून 150 लिटर डिझेल व 4100 रुपये रोख असा 18,950 रुपयांचा मुद्देमाल चोरला. एकूण 1,50,415 रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता.
LCB ची जलद कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व LCB चे पोनि किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट दिली. LCB च्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करत 1 जून रोजी अंबड, जि. जालना येथून निखील गोरे (19) व एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर 2 जून रोजी कोकमठाण येथून शिवनाथ आव्हाड (24), ओम खरात (19), राहुल कोकाटे (23) व साईराज शहाणे (21) यांना अटक करण्यात आली.
व्हेरना, स्विफ्ट कारसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
अटक आरोपींकडून व्हेरना व स्विफ्ट कार, 6 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीतील आणखी 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 227/2026 नुसार गुन्हा दाखल आहे. अटक आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार कबाडी, पोउपनि महादेव गुट्टे, विजय पवार, फुरकान शेख व इतर पथकाने केली.


