मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या ८१ लाख लाडक्या बहिणींपैकी ६२ लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरूनच ती केवायसी केलेली नाही असे लक्षात आले आहे त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा ही केवायसी पडताळणी केली जाईल असे स्पष्ट आश्वासन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. काही अर्जदारांनी विहित कालावधीत इ केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.
ज्या अर्जदारांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते असे तटकरे यांनी म्हटले आहे महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही मुख्यमंत्र देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी दिले आहे


