राहुरी कृषी विद्यापीठात धक्कादायक हत्याकांड; कंत्राटी युवकाची निर्घृण हत्या

राहुरी-शनिशिंगणापूर मार्गालगत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी रात्री घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण राहुरी तालुका हादरून गेला आहे. प्रकल्पाच्या कार्यालयात कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत युवकाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे (वय २७, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) असे आहे. श्रीकांत हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदारामार्फत कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो कामासाठी कार्यालयात दाखल झाला होता. त्याची ड्युटी रात्री एक वाजेपर्यंत होती.दरम्यान, त्याच ठिकाणी कार्यरत असलेले दुसरे कंत्राटी कर्मचारी बंडू बर्डे हे रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर आले. नेहमीप्रमाणे श्रीकांत आपल्या ठरावीक ठिकाणी दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. बॅटरीच्या प्रकाशात कार्यालयाच्या मागील बाजूस पाहणी करत असताना त्यांना एक हृदयद्रावक दृश्य दिसले.

श्रीकांत दोंदे हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाचे घाव असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तत्काळ विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली. त्यानंतर राहुरी पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अज्ञात हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येमागील कारण अद्याप गूढच असून वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य की अन्य काही कारण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड, परिसरातील हालचाली तसेच विविध संशयाच्या धाग्यांवर काम सुरू केले आहे. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडूनही महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत.

दरम्यान, श्रीकांत दोंदे यांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे गोटुंबे आखाडा परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हिरावल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles