अहिल्यानगर शहराचे आमदार अचानक कसे हिंदुत्ववादी होतात ?खासदार राऊतांचा आमदार जगतापांना टोला

ते अचानक कसे हिंदुत्ववादी होतात ?”

जोपर्यंत काही भागांत लोक निर्भय होऊन मतदान करणार नाहीत, तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतील : खा. संजय राऊत

शिर्डी, दि. २ (प्रतिनिधी) – अहिल्यानगर शहराचे आमदार कशा प्रकारे जिंकतात, त्याच्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते कसे हिंदुत्ववादी होतात, हे इथल्या जनतेला चांगलेच माहिती आहे. पण या भागातला मूळ पक्ष जो आहे, तो शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष शिवसेना आहे, असे म्हणत नव हिंदुत्ववाद्यांवर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शिर्डी येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना खा. राऊत बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी उपस्थित होते. तत्पूर्वी खा. राऊत यांनी हॉटेल ‘सन अँड सँड’ येथे अहिल्यानगर शहर शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला.

खा. राऊत म्हणाले, निवडणूक हरली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला, असे होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत तरी नाहीच नाही. महाराष्ट्रातला सर्वांत जुना पक्ष शिवसेना आहे. अडीच वर्षे आता कोणालाही निवडणुका नाहीत. हा सर्व काळ आम्ही पक्षबांधणीसाठी झोकून देणार आहोत. काल मी इथे आलो, लोकांना भेटलो. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागला आहे. या जिल्ह्यात कोण ओरिजिनल आहे? सगळे मूळचे काँग्रेसवाले! आता आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपात गेलेत.

जेव्हा आमच्याकडे सत्ता होती, तेव्हा हे सगळे लोक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी बसायचे. अशा लोकांना पक्ष वगैरे काही नसतो. जिथे सत्तेची हवा आहे, तिथे ते जातात, आज फडणवीस, मोदी आहेत तर ते तिथे आहेत. उद्या महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले तर ते सगळे आमच्या दाराबाहेर रांग लावून उभे असतील,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles