शब्दगंध साहित्यिक संमेलनात ॲड. अनुराधा येवले यांना राज्यस्तरीय पुरस्कार
अहिल्यानगर, प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ॲड. अनुराधा येवले यांना 17 व्या दोन दिवसीय शब्दगंध साहित्यिक संमेलनात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे संमेलनाला विशेष प्रतिष्ठा लाभली. साहित्य, समाजकारण आणि संस्कृती यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या प्रसंगी शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी सोमन, प्रमुख पाहुणे आयएएस अधिकारी गुलाबराव खरात, येरवडा कारागृहाचे अधीक्षक इन्स्पेक्टर रेवणजी कानडे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे व सौ. बनसोडे, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष उद्योजक राजेंद्र उदागे, मंत्रिमामा पांडुळे, शर्मिला गोसावी, घोलप मॅडम, स्वाती ठुबे आणि सुनील गोसावी तसेच साहित्यिक, कवी, लेखक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ॲड. अनुराधा येवले यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना स्वागत अध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले, “समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ॲड. अनुराधा येवले यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य प्रेरणादायी असून अशा व्यक्तींच्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळते. साहित्य आणि समाजकारण यांचा सेतू निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम शब्दगंध साहित्य परिषद करत आहे.”
शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या परिसंवाद सत्रात ‘आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण’ या विषयावर परिसंवादात ॲड.अनुराधा येवले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्त्री जीवनाचे चित्र मांडले.
राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ॲड. अनुराधा येवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या सामाजिक कार्याला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि नागरिकांचा आहे. समाजहितासाठी केलेल्या कार्याची ही पोचपावती असून यामुळे अधिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. भविष्यातही सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या उपक्रमांसाठी मी अधिक जोमाने कार्यरत राहीन.” त्यांच्या या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संमेलनादरम्यान साहित्य, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकजागृती याविषयी विविध विषयांवर चर्चासत्रे, काव्यवाचन आणि सन्मान सोहळे पार पडले. राज्यभरातून आलेल्या साहित्यिक आणि समाजसेवकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले. ॲड. अनुराधा येवले यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावरील दखल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


