अहिल्यानगर : शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला तब्बल १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या गंजबाजार भागातील व्यावसायिक वल्लभ बिहारीलाल भराडीया यांना एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. जयेश वर्मा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने आपण शेअर बाजार विषयाचे तज्ज्ञ असल्याचे भासवून भराडीया यांचा विश्वास संपादन केला. कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने ४ एप्रिल ते १४ मे २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवरून एकूण १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये भराडिया यांच्याकडून भरून घेतले.
काही दिवस उलटूनही कोणताही परतावा न मिळाल्याने आणि मूळ रक्कमही परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे भराडीया यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी जयेश वर्मा या संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आर्थिक आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस वारंवार करत असले तरी नागरिक लोभामुळे ऑनलाइन फसवणुकीला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. यापूर्वी एखादी लिंक पाठवून त्याद्वारे पैसे काढून घेतले जात होते. नंतर गुन्ह्याच्या पद्धतीत बदल करत फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवत गुन्हे करण्यास सुरुवात केली. अलीकडच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
विशेषतः सुशिक्षित व व्यापारी या फसवणुकीला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. संपर्क करणारी व्यक्ती अनोळखी असूनही नागरिक त्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापकाला अशाच पद्धतीने १ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत, मात्र आरोपी पकडले जात नाहीत. त्यामुळे आरोपी गुन्ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून फसवणूक करत आहेत. सायबर पोलिसांनी जनजागृतीसाठी मोहीम सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


