राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीकडून राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. राज्यसभेसाठी एका अपक्षाचा अर्ज दाखल झाला असून तो अवैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच राजेंद्र जैन यांची निवड निश्चित मानली जात आहे.
अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ राजेंद्र जैन यांचाच मुख्य अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा झाला आहे. त्यांच्याशिवाय एका अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे; मात्र मंगळवारी होणाऱ्या अर्ज छाननी प्रक्रियेत हा अपक्ष अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतल्याने आता ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली आहे.राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विदर्भातील एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांचा पक्षात प्रभाव वाढत गेला. पक्षाने यापूर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मधील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपचे परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता. आता थेट राज्यसभेवर जात ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत.


