अहिल्यानगर राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या गट – अ व गट – ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नियमित 3,611 पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी 112 पदे, अशा एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी., डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला., डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे 1,217, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे 589, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे 890 आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे 915 नियमित पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. गट क आणि गट ड संवर्गातील पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. शेतकर्यांच्या गरजा, शेती पुढील नवी आव्हाने विचारात घेऊन आकृतीबंध अंतिम करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षमतेत वाढ, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.


