निसर्गाच्या अवकृपेने एका गरीब शेतमजूर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. लातुरमधील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसादरम्यान वीज पडून मृत्युमुखी पडला. ऐन पेरणीच्या हंगामात शेतीसाठीचा एकमेव आधार गमावल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आणि गायकवाड यांच्या पत्नीने पुढाकार घेत थेट जू आपल्या खांद्यावर घेतले आणि शेतीची कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले.शेतकऱ्यानं बैल नसल्यानं पत्नीला नांगराला जुंपल्याचं विदारक दृश्य समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करुन दिला. स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल दिला असल्याची माहिती समोर आली आहे. पण सरकारच्या मदतीने मिळालेला तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे अशी माहिती समोर आली आहे. रोहित पवारांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबतची माहिती शेअर केली आहे.रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकऱ्यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली. आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळं आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसतं. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर पत्नीला औताला जुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने १० जून रोजी तातडीने मदत म्हणून एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने नेमका कसा आणि कोणता बैल दिला, त्याची आरोग्य तपासणी झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तात्काळ मदतीच्या नावाखाली गोशाळेतील आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. एका बाजूला शेतकरी संकटात असताना त्याला जोडीला साजेसा आणि कामासाठी सक्षम बैल उपलब्ध करून देण्याऐवजी कामचलाऊ निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मदतीचा गाजावाजा करणाऱ्यांनी आता या प्रकरणाची जबाबदारी कोणा वर ढकलावी.


