पेढे तुला करून आमदार अक्षय कर्डिले यांचा भव्य सत्कार; आगडगावच्या विकासाला मिळणार नवी गती
दिलेला शब्द पाळला; भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात – आमदार अक्षय कर्डिले
श्री क्षेत्र काळ भैरवनाथ मंदिर ट्रस्ट व अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठानचा आगळावेगळा गौरव सोहळा
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून विधानसभा गाठलेल्या नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांचा सन्मान करण्यासाठी श्री क्षेत्र काळ भैरवनाथ मंदिर ट्रस्ट आणि अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान यांच्या वतीने आगळावेगळा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांची पारंपरिक पद्धतीने पेढे तुला करून भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिक, भाविक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
यावेळी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त तसेच अधिक मासाच्या औचित्याने धोड्याचे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या सुवर्णा संदीप कोतकर यांच्या वतीने राबविण्यात आला. धार्मिक, सामाजिक आणि विकासात्मक संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की, “राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पोटनिवडणुकीच्या काळात मी मतदारांना आणि आगडगाव परिसरातील नागरिकांना विकासाची जी आश्वासने दिली होती, ती केवळ निवडणुकीपुरती नव्हती. ती माझी बांधिलकी होती आणि त्या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
ते पुढे म्हणाले की, “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी या भागाच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दिलेला शब्द आणि निर्माण केलेला विश्वास हीच माझी प्रेरणा आहे. साहेबांनी ज्या विकासदृष्टीने काम केले, त्याच विचारांचा वारसा पुढे नेत मी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आगडगाव परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, धार्मिक स्थळांचा विकास आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील.
आमदार कर्डिले म्हणाले की, “येत्या काही दिवसांत आगडगाव परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. विशेषतः बुऱ्हानगर ते आगडगाव हा मार्ग अधिक रुंद, मजबूत आणि दर्जेदार करण्यात येणार आहे. या रस्त्याचा फायदा केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही तर श्री क्षेत्र काळ भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनाही होणार आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांना आणि भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
ते पुढे म्हणाले की, “मतदारसंघाच्या विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणण्यावर भर दिला जात आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सर्व क्षेत्रांमध्ये समतोल विकास घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
आमदार कर्डिले यांनी नागरिकांचे आभार मानताना सांगितले की, “पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला विक्रमी कौल हा माझ्यासाठी सन्मान नसून जबाबदारी आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून हा विश्वास अधिक दृढ करण्याचे काम आगामी काळात केले जाईल.


