शेवगावात बेकायदेशीर मावा अड्ड्यावर एलसीबीचा छापा; १८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
अहिल्यानगर – शेवगाव येथील कोरडे वस्तीतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बेकायदेशीर मावा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत इलेक्ट्रिक मशीन, मावा, सुगंधित तंबाखू, सुपारीसह दोन कार असा एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ रहेमान तांबोळी (रा. भगतसिंग चौक, शेवगाव) हा साथीदारांसह मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
पथकाने छापा टाकला असता वसीम सत्तार तांबोळी (वय ३८) आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख (वय २७, दोघे रा. शेवगाव) हे इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना मिळून आले. चौकशीत ते फरार आरोपी आसिफ तांबोळी याच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त मुद्देमालात २ लाखांच्या दोन मशीन, ६५ किलो सुगंधित तंबाखू, ८० किलो तयार मावा, ८०० किलो सुपारी चुरा, कलर, वजन काटे आणि दोन कार (सॅन्ट्रो आणि टाटा झेस्ट) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.


