राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत पवित्र संकेतस्थळावर रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शाळा व्यवस्थापनांना ३० जूनपर्यंत जाहिराती नोंदवता येणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येते. त्यानुसार २०२५ची पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शिक्षक पदभरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ही मुदत संपुष्टात आली. मात्र, अद्यापही काही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जाहिरात देण्यास काही अडचणी असल्यास edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे पदभरती प्रक्रिया कधी होणार, किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे राज्यभरातील पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. या पूर्वी २०१७ आणि २०२२मध्ये शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात हजारो पात्रताधारकांना शिक्षक म्हणून संधी मिळाली आहे. पटसंख्येनुसार शिक्षक संख्या निश्चित केली जात असल्याने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागा शिक्षक भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे २०२५च्या पदभरती प्रक्रियेत नेमकी किती पदे उपलब्ध होतील, याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही. प्रामुख्याने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या अखत्यारितील शाळांतील रिक्त जागांकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


