चौपदरीकरण झालेल्या नागापूर चौक ते बायपास रस्त्यावर कंपन्यांच्या वाहनांचे अतिक्रमण; अपघाताचे प्रमाण वाढले .वाहतूक शाखा निद्रिस्त.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : नागापूर ते निंबळक चौक बायपासपर्यंतच्या चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावरील सर्व कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित कंपन्यांनी तातडीने स्वतःच्या जागेत वाहनतळाची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा मा.उप सभापती डॉ.दिलीप पवार यांनी दिला आहे.
नागापूर ते निंबळक चौक बायपास हा रस्ता यापूर्वी अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी या मार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले होते. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ.दिलीप पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला.
सध्या या मार्गाचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले असून वाहतुकीसाठी रस्ता अधिक सुरक्षित व सुकर झाला आहे. तसेच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्टे व फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही कंपन्यांनी या फुटपाथचा तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेचा वाहन पार्किंगसाठी वापर सुरू केला आहे.
अनेक ठिकाणी कंपन्यांची अवजड वाहने व इतर वाहने फुटपाथवर उभी केली जात असून काही ठिकाणी रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत वाहनांची रांग लागलेली दिसून येते. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि रहदारीच्या गर्दीच्या काळात अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.नागापूर ते निंबळक मार्गे जाणारा रस्ता राज्यमार्ग दर्जाचा आहे . ह्या रस्त्यावरील सर्वच कंपन्या जसे सन फार्मा कंपनी क्रॉम्प्टन कंपनी जे एम इंडस्ट्री Lauritz knudsan ( L&T) आदींच्या पदाधिकारी लोकांना भेटून पार्किंग आवारात करण्याची विनंती केली आहे ह्या अनधिकृत पार्किंग बाबत त्यांची जबाबदारी नसल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूला कामगार लोक सांगतात की त्यांना गाडी आतमध्ये लावू दिली जात नाही. तसेच कंपनीशी संबंधित अवजड वाहने ,इतर रोलर अथवा क्रेन ही सर्व बेजबाबदार पणे लावली जातात. तसेच ह्या रस्त्यावर कायम फिरणारी वाहतूक शाखेचे एक स्कॉर्पिओ आहे त्यातील अधिकारी सोईनुसार ह्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक वेळा पोलिसांना सांगून झाले आहे. येत्या दोन दिवसात ह्या सर्व कंपनी प्रशासनावर पोलिसांनी कारवाई न केल्यास कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी. कंपन्यांनी आपल्या मालकीच्या जागेतच वाहन पार्किंगची व्यवस्था करावी व सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ अडविणे तातडीने बंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


