शेवगावात सकल हिंदू समाजाचा हिंदू जनआक्रोश मोर्चा; अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
अल्पवयीन हिंदू मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध; प्रमुख हिंदुत्ववादी नेत्यांची उपस्थिती, क्रांती चौकात जाहीर सभा
शेवगाव :अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चाला’ मोठा प्रतिसाद मिळाला. शेवगावातील एका अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
बुधवार, दिनांक १७ जून रोजी सायंकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत क्रांती चौक येथे पोहोचला. त्यानंतर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला प्रमुख वक्ते म्हणून आमदार मा. श्री. संग्राम जगताप, आमदार मा. सौ. मोनिका राजळे, हिंदुत्वाचा ज्वालामुखी म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. सागर बेग तसेच आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री. नानासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. समाजातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आवाहनही करण्यात आले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शांतता व शिस्त राखण्यात आली.
ज्या जिहादी प्रवृत्तीमुळे हिंदू भगिनीला जीव गमवावा लागला, त्या मुख्य आरोपीला तर शिक्षा होईलच; पण या गुन्ह्यात पडद्यामागून साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावे शोधून त्यांना शेवगावमधून कायमचे हद्दपार करा. अशा प्रवृत्तींना या मातीत राहण्याचा किंवा मृत्यूनंतर इथे दफन होण्याचाही अधिकार नाही असा कडवट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सोहेल शेख याने एका अल्पवयीन हिंदू मुलीला धर्मांतरण करून लग्नासाठी दबाव टाकल्या कारणाने मुलीने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज, शेवगावच्या वतीने बुधवारी भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान उपस्थित प्रमुख वक्त्यांनी आरोपींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.


