दोन आठवड्यांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थिर असलेल्या मान्सूनने आज पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुंबईसह राज्यातील इतर भागात लवकरच मान्सूनची वाटचाल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात सध्या तुरळक ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. यंदा तळकोकणात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. साधारणपणे १५ ते २० जूनच्या आसपास राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनदाखल होतो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरीही राज्यात समाधानकारक पाऊस नोंदला गेला नाही. दरम्यान, रविवारपासून हवामानात बदल होत असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे. राज्यात ८ जूनपासून एकाच जागी स्थिर असणाऱ्या मान्सूनने अखेर दोन आठवड्यानंतर, आज पुणे आणि रायगड मधील अलिबागपर्यंत वाटचाल केली आहे. तसेच मध्य अरबी समुद्र, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील उर्वरित भागांसह छत्तीसगड, ओडीशा, झारखंड आणि बिहारमधील काही भागातही मान्सून पुढे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुढील ४८ तासात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात मान्सून दाखल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आज राज्यातील कोकण प्रदेशासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही बहुतांश भागांना हवामान विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे तर काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारपासून कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील तर काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


