राज्यात पावसाची दमदार एन्ट्री! पावसाचा जोर वाढला ,हवामान विभागाकडून मोठा इशारा

मागील काही दिवसांपासून हर्णे आणि सोलापूर येथे रेंगाळलेल्या मान्सूनने सोमवारी मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत यशस्वी घोडदौड केली. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबई आणि पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध भागात हलक्या सरी ते मुसळधार पाऊस कोसळत आहे.

यंदा जून महिना संपत आला तरीही राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे; तसंच काही भागांत अद्यापही उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती कायम आहे. मात्र, सोमवारपासून मान्सूनने राज्यातील इतर भागांतही हळूहळू वाटचाल करण्यास सुरुवात केल्यामुळे पुढील काही दिवसांत तो पूर्णपणे सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ८ जून रोजी हर्णे आणि सोलापूर येथे दाखल झालेल्या मान्सूनने तब्बल १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यासह अलिबाग गाठले आहे. दरम्यान, मंगळवारीही मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज हलक्या सरींना सुरुवात झाली असून पुण्यात मात्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, वरळी, मालाड, जोगेश्वरी आणि बोरिवलीसह संपूर्ण शहरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असली तरीही उकाड्यातून सुटका झाल्याने मुंबईकरांनी मोठा दिलासा मिळाला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जूनपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles