जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांच्या निपटार्यास गती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष धडक मोहीम राबवत एका रात्रीत तब्बल 255 वॉरंटची यशस्वी बजावणी केली. या मोहिमेमुळे फरार व वॉरंटधारक आरोपींमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जून रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 22 जून रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या नॉन-बेलेबल (अजामीनपात्र) आणि बेलेबल (जामीनपात्र) वॉरंटची बजावणी करण्यावर भर देण्यात आला. मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी रात्रीच्या वेळेत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून वॉरंटमधील आरोपींचा माग काढला. या कारवाईत 112 नॉन-बेलेबल वॉरंट आणि 143 बेलेबल वॉरंट अशा एकूण 255 वॉरंटची बजावणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे तसेच वॉरंट असूनही हजर न राहणार्या आरोपींविरोधात ही मोहीम प्रभावी ठरली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वय साधत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वापरून ही कारवाई यशस्वी केली. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण करण्यासाठी तसेच कायद्याची अंमलबजावणी अधिक काटेकोर करण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या धडक आणि विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


