पुण्यातील केतन अगरवाल हत्येप्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यातून धक्कादायक बाब समोर येत आहे. सिया आणि चेतन यांची ओळख क्रिकेटच्या माध्यमातून झाली असून सियाचा भाऊ साहिलमुळे हे दोघे संपर्कात आले असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
क्रिकेटपटू असलेल्या चेतनने साहिलबरोबर काही सामने खेळले होते आणि सामन्यांच्या वेळी सिया अनेकदा तिच्या भावासोबत सामने पाहायला जायची. याच ठिकाणी सिया आणि चेतनची पहिली ओळख झाली आणि त्यानंतर ते पुन्हा एकमेकांना भेटले, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सांगितलं की, २०२५ मध्ये एका मित्राने आयोजित केलेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात सिया आणि चेतन पुन्हा भेटले. या भेटीनंतर त्यांच्यातील संवाद लक्षणीयरीत्या वाढला. तपासकर्त्यांनी कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले असता, हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून नियमित संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यापासून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात तब्बल २,००४ वेळा फोनवर बोलणं झालं. या संभाषणाचा एकूण कालावधी जवळपास २३८ तास इतका होता. यामुळे दोन्ही आरोपींमध्ये सातत्याने संवाद सुरू असल्याचं स्पष्ट होतं.
पोलिसांनी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल गोयल याची सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंधांबाबत सुमारे १० तास चौकशी केली. त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. “आम्ही त्याला सकाळी चौकशीसाठी बोलावलं होतं. उशिरा संध्याकाळी त्याला सोडण्यात आलं,” अशी माहिती स्थानिक पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय शी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, “साहिल चेतनला ओळखतो, त्यामुळे आम्ही त्याच्याकडून काही गोष्टींची पडताळणी करून घेतली. त्याची सुमारे १० तास चौकशी करण्यात आली.” साहिलची चौकशी करण्याव्यतिरिक्त, स्थानिक पोलीस या प्रकरणाशी संबंधित सियाच्या इतर नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्याच्या तयारीत आहेत.


