‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठक संपन्न, कृती समितीची पुनर्रचना; पाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार.
शेवगाव,ता.२८ : “ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला असून, आपण मुर्दाडसारखे पडून राहणे योग्य नाही. इतर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी पाणी पळवून नेण्याच्या प्रयत्नांत असताना, धरण उशाला असूनही आपण मात्र तहानलेले आहोत. तालुक्याच्या इतिहासातील “कोपरे धरणाचे पाणी लाडजळगाव पर्यंत आणू” ही एक निव्वळ वल्गना ठरल्याने ‘जसा या योजनेचा दहावा’ घातला तशी वेळ ‘ताजनापूर’वर येऊ नये यासाठी वेळीच जागे होऊन पाणी मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असा एल्गार अॅड. शिवाजीराव काकडे यांनी पुकारला आहे. शासन-प्रशासनाने हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’ या योजनेच्या पूर्णत्वासाठी शेवगाव येथील श्री संत गाडगे महाराज छात्रालयामध्ये रविवारी (दि. २८) लाभार्थी गावातील शेतकरी, युवक आणि महिलांची अत्यंत निर्णायक बैठक अॅड. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मा.जि.प.सदस्या सौ. हर्षदा काकडे, माणिक म्हस्के, जगन्नाथ गावडे, नवनाथ ढाकणे, लक्ष्मण गवळी, अर्जुन ढाकणे, मधुकर झिरपे, रामजी पोटफोडे, बंडूभाऊ म्हस्के, रामराव ढाकणे, संजय काकडे, प्रमोद तांबे, गोरक्ष भोसले, अरुण खर्चन, मच्छिंद्र भापकर, रंगनाथ ढाकणे, प्रा.दादासाहेब जवरे, विठ्ठल केदार, नारायण टेकाळे आदी उपस्थित होते.
या बैठकीत जुनी ताजनापूर कृती समिती बरखास्त करून नव्या कृती समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या निमंत्रकपदी लक्ष्मणराव गवळी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, योजनेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावात महिला व युवकांसह स्वतंत्र ग्रामस्तरीय कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवून संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे. शासनाचे आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली असुन “जर शासन आणि प्रशासनाने ताजनापूर योजनेचा प्रश्न तातडीने निकाली काढला नाही, तर थेट राज्याचे उप मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात येईल,” असा स्पष्ट मनोदय समितीचे अध्यक्ष अॅड.काकडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या बैठकीला कृती समितीचे नवनियुक्त पदाधिकारी,ज्येष्ठ मार्गदर्शक,संबधित गावागावातील शेतकरी,युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प सदस्या काकडे यांनी केले.सूत्रसंचालन भाऊसाहेब सातपुते यांनी केले. दरम्यान, ‘ताजनापूर योजने’वरून शेवगाव तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणूक आली की ताजनापूर आठवते या आरोपामुळे आम्ही एक–दीड वर्ष आम्ही शांत बसलो मात्र योजनेचे काम अपूर्णच राहिल्याने गावा-गावातील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे हा लढा पुन्हा शेतकऱ्यांच्या साथीने पूर्ण ताकदीने लढणार आहोत.
हर्षदा काकडे, माजी जि.प सदस्या.
नव निर्वाचित ताजनापूर कृती समिती
सखाहरी भापकर, भाऊसाहेब बोडखे, माणिक म्हस्के, गोरक्ष वावरे, अॅड.संजय काकडे, विठ्ठल केदार, विष्णू शिरसाठ, प्रा.दादासाहेब जवरे, सुधाकर धावणे, नवनाथ ढाकणे, संदीप झिरपे, वीर भाऊसाहेब, अन्साराम बोडखे तर निमंत्रक म्हणून लक्ष्मणराव गवळी यांचेसह नवीन कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
‘दुष्काळी गावात जन्माला आलो, पण दुष्काळी म्हणून मरणार नाही!’
बैठकीत विविध वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पाणी प्रश्न किती गंभीर आहे हे या मे-जून महिन्यात प्रकर्षाने जाणवले आहे. पाण्याअभावी शेतात उभ्या उसाची चिपाडे झाली आहेत. कै.आबासाहेबांनी सुरू केलेला हा लढा पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ताकदीने पुढे चालवला जाईल. ‘दुष्काळी गावात जन्माला आलो, पण दुष्काळी म्हणून मरणार नाही!’ अशी खुणगाठ बांधून १३ गावांना पाणी मिळेपर्यंत अॅड. काकडे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


