अहिल्यानगरमध्ये आजपासून मतदारयादी विशेष पुनरीक्षण; गणना प्रपत्र भरल्याशिवाय नव्या यादीत नाव नाही

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

३ हजार ८३० बीएलओ ३० जूनपासून घरभेटी घेणार

अहिल्यानगर,: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, या मोहिमेद्वारे प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुनील गाढे, तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, १ ऑक्टोबर २०२६ हा या पुनरीक्षणासाठी पात्रता दिनांक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ३ हजार ८३० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन त्यांना गणना प्रपत्राचे वितरण करतील. या प्रपत्रात मतदारांची वैयक्तिक माहिती व आवश्यक कागदपत्रांची नोंद घेण्यात येणार असून, त्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, २९ जुलै २०२६ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ हजार ८३० मतदान केंद्रे असून, या कामासाठी १२ निर्वाचक नोंदणी अधिकारी, ३६९ सहायक निर्वाचक नोंदणी अधिकारी, ३ हजार ८३० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि ६ हजार ९७१ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यातील ३८ लाख १० हजार १०२ मतदारांपैकी ३२ लाख ५० हजार ६९३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, म्हणजेच ८५.३२ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात ९२.८४ टक्के, संगमनेरमध्ये ९२.३७ टक्के, शिर्डीमध्ये ८२.८८ टक्के, कोपरगावमध्ये ८५.०९ टक्के, श्रीरामपूरमध्ये ८७.९५ टक्के, नेवासामध्ये ८५.६५ टक्के, शेवगावमध्ये ८५.९२ टक्के, राहुरीमध्ये ८३.१६ टक्के, पारनेरमध्ये ८६.६६ टक्के, अहिल्यानगर शहरात ७१.१९ टक्के, श्रीगोंदामध्ये ८४.६८ टक्के आणि कर्जत-जामखेडमध्ये ८६.७४ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांचे मॅपिंगही विहित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

घरभेटीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. तसेच सर्व राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी आणि नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहकार्य करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles