अहिल्यानगर -जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे व महेश नारायण कुर्हे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (23 जून) न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची (6 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल बबन जाधव (वय 40, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) याला अटक केली होती. आतापर्यंत तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. स्वप्नील शिंदे व महेश कुर्हे हे दोघे खून, मोक्का कलमान्वये दाखल गुन्ह्यात अटकेत होते. त्यांना नाशिक कारागृहातून वर्ग करून फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
डॉ. अनिल सुर्यभान आठरे (वय 73, रा. झोपडी कॅन्टींग, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. त्याला सुरूवातीला अटक करण्यात आली. यानंतर स्वप्नील शिंदे व महेश कुर्हे हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना वर्ग करून घेण्यात आले. त्यांना मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
14.66 लाखांची फसवणूक
मुख्य संशयित स्वप्नील शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला. संशयित आरोपींनी डॉ. आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरूवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या. इतकेच नाही, तर बनावट मालक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून डॉ. आठरे यांना दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉ. आठरे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यांची एकूण 14 कोटी 66 लाख 51 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.


