अहिल्यानगर एमआयडीसीत कर्मचार्‍याची आत्महत्या ; वरिष्ठ अधिकारी व युनियन पदाधिकार्‍यांविरूध्द गुन्हा

अहिल्यानगर-एमआयडीसीतील जी.के.एन. सेंटर प्रा. लि. या कंपनीतील कर्मचार्‍याने कंपनीच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत कर्मचार्‍याच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (8 जुलै) दिलेल्या फिर्यादीत कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे आणि वारंवार करण्यात येणार्‍या अपमानास्पद वागणुकीमुळे तसेच संबंधित युनियन पदाधिकार्‍यांनीही वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली नसल्याने त्यांच्या पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सचिन आदिनाथ भदर्गे (रा. सावेडी, मुळ रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍याचे नाव असून त्यांची पत्नी कल्पना यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फिर्यादीनुसार, सचिन भदर्गे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सतत मानसिक तणावाखाली राहत असल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले होते. 5 जून रोजी पत्नी आणि त्यांच्या भावाने सचिन यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी कंपनीतील विभागप्रमुख समीर शेवाळे, प्लांट हेड पुरूषोत्तम ऋषी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामात चूक नसतानाही वारंवार टोमणे मारून अपमान करत असल्याचे सांगितले. कंपनीतून काढून टाकण्याची धमकीही दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

या सततच्या मानसिक त्रासामुळे आपण अत्यंत तणावाखाली असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. याचबरोबर, कंपनीत झालेल्या एका बैठकीत आपल्याशी अपमानास्पद वागणूक झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर वर्क्स युनियनचे जनरल सेक्रेटरी बाबासाहेब निर्मळ आणि उपाध्यक्ष विठ्ठल हंडोरे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, युनियनकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 6 जून रोजी सचिन यांनी मध्यरात्रीनंतर त्यांच्या कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी समीर शेवाळे, पुरूषोत्तम ऋषी, बाबासाहेब निर्मळ व विठ्ठल हंडोरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेवाळे, निर्मळ व हंडोरे यांना अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, मयत सचिन यांच्या खिशात स्वहस्ताक्षरात लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली. या चिठ्ठीत कंपनीतील वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला आणि वारंवार होणार्‍या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद असल्याचा दावा पत्नीने केला आहे. चिठ्ठीवरील हस्ताक्षर व सही ही आपल्या पतीचीच असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles