राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत असतानाच, कर्जत नगरपंचायतीतही एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या स्थानिक नगरसेवकांनी एकत्र येत नगरपंचायतीत अभूतपूर्व सत्तांतर घडवून आणले आहे. या नव्या राजकीय समीकरणांमधून भाजपच्या छाया सुनील शेलार यांची कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी विशेष सभेमध्ये या निवडीची अधिकृत घोषणा केली. नगराध्यक्ष पदासाठी छाया शेलार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली होती. मात्र, आज त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
छाया शेलार यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नगरसेवकांनी उघड पाठिंबा दिल्याने तालुक्याच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन कट्टर विरोधी गट स्थानिक पातळीवर एकत्र आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणातही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच कर्जतमध्ये घडलेल्या या घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
छाया शेलार यांची निवड जाहीर होताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, ज्येष्ठ नेते ॲड. कैलास शेवाळे यांच्यासह अनेकांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर उपस्थित सर्व १३ नगरसेवकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. नवनियुक्त नगराध्यक्षांसह सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत श्री गोधड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कर्जत शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली.
विजयानंतर गोधड महाराज मंदिर परिसरातच एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजप नेते सुनील शेलार यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “ही गोधड महाराजांची पवित्र भूमी आहे, येथे फसवाफसवीचे राजकारण चालत नाही. सभापती प्रा. राम शिंदे यांनी शब्द पाळत आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. विरोधकांनी केवळ बिनबुडाचे आरोप करून सत्ता मिळवण्याचे राजकारण केले, पण जनता आता याला थारा देणार नाही,” असे शेलार म्हणाले. तसेच उर्वरित कमी कालावधीत शहराचा पाणीप्रश्न, वीज आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्याला जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे, जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, सुनील यादव, शांतीलाल कोपनर, उमेश जेवरे, सचिन पोटरे, स्वप्निल तोरडमल, सचिन कुलथे, दत्ता नलवडे, रवींद्र सुपेकर, प्रतिभा रेणुकर, नीता कचरे, आशा वाघ यांसह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राणे यांनी केले, तर आभार प्राचार्य सय्यद यांनी मानले.


