श्रीरामपूर आकाश दुबैय्या हत्या प्रकरण: एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन

श्रीरामपूर: आकाश दुबैय्या हत्येनंतर सोशल मीडिया व अन्य प्रकारे अफवा पसरविल्या जात आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखविला जात आहे. ते चुकीचे असून पोलिसांची कारवाई सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले. शहर पोलिस ठाण्यात दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यापारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी (दि, १८) सुसंवाद बैठक आयोजित केल्याची माहितीही त्यांनी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक विशाल खैरे व अरुण नलावडे आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने व्यापारी, उद्योजकांशी सुसवाद बैठक शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे. व्यापारी मंगल कार्यालयात होणाऱ्या याबैठकीत शहरवासीयांना पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या सुसंवाद बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे, असे सुदर्शन यांनी या वेळी सांगितले.

यापूर्वी कोणी ऐकल्या असतील, नसतील; दाखल झाल्या असतील वा नसतील, कारवाई झाली असेल-नसेल अशा सर्व तक्रारी नागरिकांनी या बैठकीत मांडाव्यात. पोलिस व नागरिकांतील दुरावा कमी होऊन संवाद वाढावा, यासाठी हा संवाद पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. याची सुरुवात जिल्ह्यात श्रीरामपूर येथून केली जात असल्याचे मुम्मका सुदर्शन म्हणाले.नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात किंवा अन्य ठिकाणी तक्रार निवारण केंद्रही सुरू केले जाणार आहे. तेथे थेट तक्रार दाखल करून घेण्यात येईल. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुदर्शन यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles