अहिल्यानगर: जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादीच वापरली जाणार आहे. २४ जुलैला प्रारूप व ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
अहिल्यानगर ६०, राहता २५, श्रीरामपूर २७, अकोले ५२, जामखेड ४९, शेवगाव ४८, संगमनेर ९४, पारनेर ८८, पाथर्डी ७९, श्रीगोंदा ६२, नेवासा ५९, कर्जत ५५, राहुरी ४४, कोपरगाव २९ अशा या ८४३ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपलेल्या तसेच नव्याने तयार झालेल्या अशा एकूण ८४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने लवकरच या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते.
ग्रामपंचायतसाठी ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
जिल्ह्यातील या ८४३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. मात्र या प्रशासकांच्या अधिकारावर मर्यादा आणल्या गेल्या आहेत. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे गाव पुढाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. ग्रामपंचायतसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. विधानसभा व प्रभागांची माहिती संकलित करून संगणक प्रणालीवर भरली जाईल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी २४ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.


