राज्यात मागील काही दिवसांपासून जुलै महिन्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
यंदा भारतासह जागतिक पातळीवर हवामान बदलाचे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. पावसाचे असमान प्रमाण, कमी कालावधीत होणाऱ्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे निर्माण होणारी पूरस्थिती तर अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश्य स्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. देशातील अनेक भागात यंदा पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची तूट कायम आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत आहे.रम्यान, वादळी पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून केवळ काही भागातच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा सर्वाधिक प्रभाव असून तेथे दोन दिवसांपासून चांगला पाऊस नोंदना जात आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ८:३० ते रविवारी सकाळी ८:३० या दरम्यान गडचिरोली येथे २१.९ मिमी तर गोंदिया येथे ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली तर उर्वरित राज्यातील बहुतांश प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे. कोकण प्रदेशातही मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला आहे. या प्रदेशातील बहुतांश भागात मागील दोन महिन्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात तर विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागात हवामान विभागाने वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


