दहशतमुक्त, अतिक्रमणमुक्त अहिल्यानगर निर्माण करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कापड बाजार मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

दहशतमुक्त, अतिक्रमणमुक्त अहिल्यानगर निर्माण करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गुंडगिरी, अवैध धंदे आणि अतिक्रमणाविरोधात पोलिसांना कडक कारवाईचे आदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बहुप्रतीक्षित कापड बाजार येथील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी शहरातील गुंडगिरी, दहशत, अतिक्रमण आणि अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेत दहशतमुक्त अहिल्यानगर शहर निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर हे ऐतिहासिक शहर असून कापड बाजार पेठ राज्यभर प्रसिद्ध आहे. आपण शाळेत जात असल्यापासून हा बाजार पाहत आहोत. मात्र काही लोक गुंडगिरीच्या जोरावर दहशत निर्माण करत असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहर दहशतमुक्त करण्याच्या कामाची सुरुवात आमदार संग्राम जगताप यांनी कापड बाजारातून केली आहे.
पोलीस प्रशासनाला आदेश देताना विखे पाटील म्हणाले की, तुमच्याकडे छेडछाड किंवा गुंडगिरीची तक्रार आली तर संबंधितांवर थेट कारवाई करा; अन्यथा त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. शहरातील अवैध धंदे तातडीने बंद करा. पोलिसांनी ऑपरेशन करून गुंडांचा बंदोबस्त करावा. शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.
आमदार संग्राम जगताप यांनी विकासकामांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराला चांगले स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे. शहरामध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी आले पाहिजेत. त्यातून बाजारपेठेची आणि शहराची आर्थिक उन्नती होईल. कापड बाजारात विद्युत तारांचे मोठे जाळे दिसत असून ते आता भूमिगत करण्याचे काम केले जाणार आहे. बाजारपेठेत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
काही लोकांचे धाडस एवढे वाढले आहे की महिलांवर हात टाकण्याचे प्रकार केले जात आहेत. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त केला जाईल. शिर्डी येथे डिफेन्सचा प्रकल्प आणला असून श्रीरामपूर जिल्ह्यातही दुसरा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी १५०० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. शहरामध्ये नवनवीन उद्योग आणले जातील. बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन बाजारपेठा अधिक फुलतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.
विकासकामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ठेकेदाराला कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या कामासाठी आम्ही पुढे उभे राहू, तुम्ही आमच्या मागे उभे रहा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी कापड बाजार रस्त्याच्या विकासाचे चांगले नियोजन केले असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कापड बाजार हा पारंपरिक मिरवणुकीचा मार्ग असून ही एक सुप्रसिद्ध बाजारपेठ आहे. राज्यभरातून ग्राहक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून थेट गल्लीपर्यंत विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासाठी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.
कापड बाजार अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. काही लोकांना बोट धरले की ते हात धरतात आणि नंतर खांद्यावर बसतात. त्यानंतर बाजारपेठेत दादागिरी करून आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करून बसतात. मात्र बाजारपेठेत अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. रस्त्याच्या विकासकामाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
आमच्या विकासकामांच्या अजेंड्याबरोबरच धर्माचा अजेंडाही आम्ही घेतला आहे. अहिल्यानगरच्या विकासकामांना चालना देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी नवीन उद्योग आणले जातील. कापड बाजार परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम केले जाणार आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
यावेळी मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देताना आमदार जगताप म्हणाले की, महापालिकेतील कंत्राटी कामगाराने डोक्याला भगवा टिळा लावला होता म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कापड बाजार मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, स्थायी समिती सभापती पै. सुभाष लोंढे, मर्चंट बँकेचे चेअरमन संजय चोपडा, मनपा महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, किशोर डागवले, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक निखिल वारे, विकी जगताप, संभाजी पवार, विशाल पवार, संजय ढोणे, सतीश शिंदे, ईश्वर बोरा, पुष्कर कुलकर्णी, प्रकाश भागानगरे, जालिंदर कोतकर, महेश तवले, महेश लोंढे, मनोज दुल्हम, ऋग्वेद गंधे, अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, अनिल ढवण, सुशांत जाधव, विकी वाघ, संतोष गेन्नाप्पा, नगरसेविका आशाताई डागवाले, सुनिता गेणाप्पा आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक ईश्वर बोरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles